पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजपचे तरुण, तडफदार आमदार म्हणजे महेशदादा लांडगे. महेश लांडगे यांच्या तडफदार व्यक्तिमत्वामुळे ते नेहमीच लोकांच्या सेवेसाठी पुढे सरसावतात. आमदार महेश लांडगे हे नेहमी नागरिकांच्या सेवेसाठी सामाजिक उपक्रम राबवत असतात. विशेष म्हणजे महेशदादा लांडगे यांचा आज वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा केला जातो. याही वर्षी त्यांनी आपला वाढदिवस कोरोना योद्धांना समर्पित केला आहे. याबाबत त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहिली आहे.
‘माझे परिचित, सहकारी सर्वच 27 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस साजरा करण्यास उत्सूक असतात. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिकट बनली आहे.निकटवर्ती कोरोनाने हिरावून नेण्याचे माझ्यासारखे वेदनादायक अनुभव तुमचेही असतील, पण तरीही आपण एकमेकांना धीर देत या संकटाचा सामना करत आहोत. अशा परिस्थितीत यावर्षी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही.परंतु, आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत, नियमांचे पालन करत आपल्या परिसरातील गरजू नागरिकांना मदत केल्यास मला माझा वाढदिवस साजरा झाल्याचे निश्चितच समाधान मिळेल. यावर्षीचा माझा वाढदिवस कोरोना योद्धयांना समर्पित करण्याचे ठरवले आहे. तेव्हा वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग लावू नयेत. तसेच कार्यक्रम, अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करु नये. सोशल मीडियाद्वारे मला आपले शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावेत, ही विनंती !’ अशी विनंती करत महेशदादा लांडगे यांनी आपला वाढदिवस कोरोना योद्धांना समर्पित केला आहे.
महेश दादांची राजकीय कारकीर्द-
महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड मधील भोसरी मतदार संघाचे आमदार. आमदारकीची ही त्यांची दुसरी टर्म आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. आणि नंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले.त्यांनतर गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत ते भाजपकडून भोसरी मतदारसंघातून ७७ हजार मतांनी निवडून आले. आणि त्यांनी पिंपरी चिंचवड मधील भोसरी मध्ये आपला राजकीय दरारा कायम ठेवला. तसेच मोठा योगायोग म्हणजे गेल्यावर्षी २७ नोव्हेंबर रोजी म्हणजेच त्यांच्या वाढदिवशी त्यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली. त्याला आता वर्षपूर्ती झाली आहे. तसेच २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
महेशदादा लांडगे यांची राजकीय कारकीर्द एनएसयुआयचे शहराध्यक्ष पदापासून सुरु झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी पहिले पाऊल ठेवले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनतर २००४ ला ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक झाले. नंतर त्यांनी या पदाची हॅट्रिक केली. राष्ट्रवादीत बरीच वर्ष चपळ आणि वादग्रस्त राजकीय कारकिर्दीनंतर राष्ट्रवादी पक्षाला राजीनामा देऊन त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २५ ऑक्टोबर २०१६ रोजी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार महेशदादा लांडगे यांनी या एका वर्षाच्या कालावधीत पिंपरी चिंचवड भाजपतर्फे अनेक उपक्रम राबवले. तसेच आपल्या भोसरी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी भोसरी व्हिजन २०२० हा उपक्रम देखील राबवला होता. यामध्ये समाविष्ट असलेल्या एकूण 30 उपक्रमांपैकी अनेक प्रकल्प पूर्ण झाले किंवा सन २०२० पर्यंत पूर्ण होतील
भोसरी व्हिजन २०२० या उपक्रमामधील 10 प्रकल्प जे नागरिकांच्या जीवनावर चांगला परिणाम करत आहेत –
- उर्जेचा अपव्यय
- नमामि इंद्रायणी – नदी कायाकल्प
- आंतरराष्ट्रीय सफारी पार्क
- संविधान भवन
- सीबीएससी शाळेला जोडलेली संतपीठ
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
- आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संकुल
महेशदादांचे सामाजिक कार्य
महेश लांडगे यांचा सामाजिक कार्यात मोठा वारसा आहे. या सामाजिक कार्यासाठी महेशदादांनी काही टीम तयार केल्या आहेत. ज्याद्वारे ते गरजू लोकांना त्यांच्या प्रमुख उपक्रमांद्वारे मदत करत आहेत
- महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन
- महेशदादा व्हिजन अकॅडमी
- हौसिंग सोसायटी फेडरेशन
- शिवांजली सखी मंच
- परिवर्तन हेल्पलाईन
- वायसीएम हेल्प डेस्क
- वर्कर वेलफेअर असोसिएशन
या काही सामाजिक उपक्रमांद्वारे ते तरुण वर्गाला प्रोत्साहित करतात तर गरीब गरजूना मदत करतात.
पिंपरी चिंचवड मध्ये भारतीय जनता पक्षाची नवी उमेद म्हणजे महेशदादा लांडगे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीचे कौतुक केले होते. ते म्हणाले, “भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आपलं राजकीय स्थान एवढं भक्कम करून ठेवलं आहे, की त्यांना हरवणं आता कोणालाही शक्य नाही. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे ‘हरणं मला माहीत नाही’, हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी ठासून भरलेला आहे. आगामी राजकीय जीवनात कितीही कठोर अडथळे आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची त्यांची भूमिका इतरांना आदर्श घालून देणारी ठरेल, अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महेशदादांचे कौतुक केले होते.
महेशदादा लांडगे यांच्या तत्परतेमुळे आणि कार्यामुळे भोसरी मतदारसंघात त्यांचा दरारा अजूनही कायम आहे. गरजु – गरीब लोकांना मदत करणे. लोकांच्या संकटात धावून जाणे हा त्यांचा स्वभावच जणू. अशा या तडफदार व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!