शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश जगाला देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी म्हणजे आंबडवे या ठिकाणी असलेली शाळा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. दापोलीतील ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची डागडूजी करण्यासाठी आता भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या साथीने पिंपरी-चिंचवड भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदती’चा उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादाळत नुकसान झालेल्या कोकणातील विविध गावांमध्ये मतदकार्य करण्याचा निर्धार केला आहे. बुधवारी सकाळी ही मदत शाळेला पोहोच झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे आदी उपस्थित होते
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. याठिकाणी सांस्कृतिक भवन, जिमखाना, महिला वसतिगृह आहे. मंडणगडपासून सुमारे १७ किमी अंतरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव आंबवडे आहे.
आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर व असोंड येथील आश्रमशाळा व वसतिगृह चालवले जाते. अत्यंत ग्रामीण भागात संस्थेचे कार्य सुरू आहे. भटक्या विमुक्त समाजातील मुलांना, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत. या हेतुने संस्था कार्यरत आहे. गेल्या २६ वर्षांपासून संस्थेच्या ज्ञानार्जनाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.
आंबडवे येथील आपल्या शाळेच्या इमारतीवरील व सांस्कृतिक भवनावरील एकही पत्रा व शेड शिल्लक राहिलेली नाही . तशीच परिस्थिती मंडणगड कॉलेज व बाकी शाळांची झालेली आहे . किमान 50 ते 60 लाखांचे नुकसान आपल्या सर्व प्रकल्पाचे झाले आहे. गेल्या महिनाभरात पत्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सांस्कृतिक भवन आणि महिला वसतिगृहाचे काम मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मंडणगडच्या युनिटचे मोठे नुकसान झाले. संस्थेच्या सर्वच पाच युनिटमधील वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे
संस्थेला महाराष्ट्र शासनाचा मनाचा शाहू- फुले-आंबेडकर हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. परंतु, निसर्ग चक्रीवादळ होवून एक महिना झाला. पण, राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून कसलीही मदत संस्थेला मिळालेली नाही या संस्थेच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या कोरोनामुळे शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा बंद आहेत. पण, शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व डागडूजी करण्याची चिंता संस्था चालकांना आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीसाठी गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला आहे