गेल्या अनेक वर्षांपासून के. के. रेंजबाबत ठोस निर्णय न घेता पारनेर तालुक्यातील अनेक राजकीय पुढार्यांनी या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजली आहे. याच संदर्भात आज पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.
के के रेंज प्रश्नी शरद पवार यांनी संभाव्य बाधीत २३ गावातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांनो घाबरू नका, वेळ पडली तर मी रणांगणात उतरेल अशा आशयाची एक पोस्ट आमदार लंके यांनी आपल्या सोशल मीडियावरून केली आहे आणि के. के. रेंजबाबत शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले आहे.
मुंबईत झालेल्या या भेटीदरम्यान या संबंधी लवकरच शरद पवार हे शिष्टमंडळासह संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेणार असल्याचे देखील लंके यांनी सांगितले तसेच के के रेंज प्रश्नाचा आपला अभ्यास आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमिनींचे अधिग्रहण होऊ देणार नाही अशी शरद पवारांनी ग्वाही दिल्याचे देखील लंके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ, वनकुटा, गाजदीपूर, पळशी, ढवळपूरी यांसह परिसरातील अन्य गावे जिरायत भाग होता. आता मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत शेतकर्यांनी कष्टाने आपले क्षेत्र बागायत केली आहेत. आता एक इंचही जमिन शेतकरी देणार नाहीत अशी भूमिका आमदार लंके यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली होती याच अनुषंगाने ही भेट महत्वाची मानली जात आहे.
यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासोबत जि.प.सदस्य धनराज गाडे, वनकुटेचे सरपंच अँड.राहुल झावरे व गणेश हाके हे देखील उपस्थित होते.