मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर ठाण्यात शिवसेनाविरुद्धमनसे असा वाद रंगला आहे. अविनाश जाधव यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांनाही एक दिवस अशाचप्रकारे घरातून उचलून नेऊ असे विधान केले होते. त्यावर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी प्रत्युत्तर दिले होते.
आम्ही पदावर असलो तरी शिवसेनेत आमचं एक पद आहे ते शिवसैनिक..त्यामुळे आमच्या नादी लागू नका असं राजन विचारे म्हटले होते. असे आव्हान राजन विचारे यांनी अविनाश जाधव यांना दिले त्यावर अविनाश जाधव यांनीदेखील आता प्रत्युउतर दिले आहे.
अविनाश जाधव म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो, कोणत्या शिवसैनिकाला उचलणं हा माझा धंदा नाही. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या मुशीतले आहोत, आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड नितांत आदर आहे. मी म्हटलं होतं जे आम्हाला त्रास देतात ते..तुम्ही आम्हाला त्रास देतायेत का असा अर्थ होतो. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले? असा सवाल त्यांनी केला.
तसेच जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा त्रास देणाऱ्यांना असेच उचलून नेऊ हे विधान होते, कोणाला उचलून न्यायचं की नाही न्यायचं तर तो शिवसैनिक आहे. मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आज अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे राजसाहेबांचा आदर करतात. शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असं म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आम्ही वाट पाहतोय असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी खासदार राजन विचारेंना दिला आहे.