पार्थ पवार यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्यावर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असतानाही पार्थ पवार यांनी सुशांतसिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला विरोध करत असतानाच पार्थ पवार यांनी भाजपच्या मागणीलाच एक प्रकारे समर्थन करत, महाविकासआघाडीला अडचणीत आणलं.
दरम्यान, पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा देणारं ट्विटही केलं. जय श्रीराम म्हणत पार्थ पवार यांनी राम मंदिरासाठी शुभेच्छा देणारं पत्रही लिहिलं. राम मंदिर भूमिपूजनामुळे कोरोना जाणार नाही, असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या भूमिकेलाही पार्थ पवार यांनी छेद दिला.