नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 6 शहरांनी परवडणाऱ्या स्वस्त घरांचे गिफ्ट दिले आहे. ग्लोबल हौसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज-इंडियाच्या (जीएचटीसी-इंडिया) सहा गृहनिर्माण प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते पार पडला. इंदोर, राजकोट, चेन्नई, रांची, आगरतळा आणि लखनऊ येथे प्रत्येकी एक हजार घरे बांधण्यात येणार आहेत.
देशातील सहा राज्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यात आले असून त्याद्वारे देशातील गृहनिर्माण बांधकाम क्षेत्राला नवी दिशा मिळेल आणि सहकारी संघराज्यवादाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास देखील पायाभरणी समारंभावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
देशातील सहा शहरांमध्ये 12 महिन्यांमध्ये एक हजारांहून अधिक घरे बांधण्याबाबतचा हा प्रकल्प आहे. हे सहा प्रकल्प देशातील गृहनिर्माण बांधकाम क्षेत्राला नवी दिशा देतील, असेही ते म्हणाले.
आपले सरकार सर्वासाठी घर हे उद्दिष्ट साध्य करील, या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणारी घरे परवडणारी आणि आरामदायी असतील. ग्रामीण भागांत दोन कोटी घरे बांधण्यात आली आणि आणखी घरे वेगाने बांधण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले.