सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी मोदींनी त्यांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रविण जाधव तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मराठमोळ्या ऑलिम्पियन खेळाडूसह मोदींनी त्यांच्या आई-वडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आर्थिक हलाकीतून ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या प्रविण जाधवच्या कुटुंबियांचे मोदींनी विशेष कौतुक केले. आपल्या मुलाला क्रीडा क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी प्रेरणा देणारे पालक खऱ्या अर्थाने चॅम्पियन आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले.
हे पण वाचा: फडणवीस-पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर, रामदास आठवलेंचा धक्कादायक खुलासा!
तसेच मेहनत, प्रामाणिकपणा व चिकाटीची ताकद काय असते हे देशाला प्रवीण जाधवच्या रुपातून दिसले आहे. टोकीयो ऑलंपिकमध्ये ध्येय व लक्ष यावरुन नजर हटू देवू नका. जिंकण्याच्या दबावात न खेळता निर्भिडपणे आपला सर्वोत्तम खेळ दाखविण्याच्या इर्षेने खेळा, १३५ कोटी भारतीयांच्या शुभेच्छा व आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
हे पण वाचा: स्वबळावर लढण्याबाबतीत काँग्रेसमध्ये दोन गट? वडेट्टीवारांनी स्पष्ट केली आपली भूमिका
जपान येथे होणाऱ्या टोकीयो ऑलंपिक स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सरडे (ता. फलटण) येथील प्रविण जाधव (धनुर्विद्या) व अन्य विविध क्रिडा प्रकारांतील खेळाडू व त्यांच्या परिवाराशी पंतप्रधानांनी आज ऑनलाईन संवाद साधत प्रेरणा दिली. यावेळी पंतप्रधानांनी प्रविणसह अन्य खेळाडू व त्यांच्या परिवारातील सदस्यांशी मनमोकळेपणाने चर्चा केली व काही माहितीही जाणून घेतली. कोरोना काळातील संकट, सरावात आलेले अडथळे याशिवाय दुखापतीतून सावरुन देशासाठी खेळण्याच्या जज्बा या सर्व गोष्टींवर मोदींनी खेळाडूंशी चर्चा केली.
हे पण वाचा: लोणकर कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सांत्वन करताना मुख्यमंत्री म्हणाले…
टोकियोसाठी पात्र ठरलेला प्रविणचा प्रवास सहज शक्य झालेला नाही. भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या प्रविणने दोन वर्षांहून अधिक काळ कठोर मेहनत घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे या छोट्याशा गावातून तो इथपर्यंत पोहचलाय. मोदींशी संवाद साधताना प्रविणने ऑलिम्पिक पर्यंत धडक मारलेल्या प्रवासाची कहाणीही सांगितली. कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. या गोष्टीचा बावू न करता प्रवास निश्चित केला, असेही तो यावेळी म्हणाला. जिद्दीच्या जोरावर कोणताही अडथळा पार करता, येतो असा संदेशच प्रविणने यावेळी दिला.
प्रविणसारखे अन्य मुलांनीही खेळावे…
तुमचा मुलगा ऑलंपिकमध्ये खेळणार आहे. त्या अनुषंगाने आपणास काय वाटते, असा प्रश्न पंतप्रधानांनी रमेश जाधव यांना विचारला. ‘प्रविणचे नाव देशभरात झाले आहे. गावाचेही नाव सर्वत्र झाले, याचा आपणास आनंद होतो. ग्रामिण भागातील अन्य मुले प्रविणसारखे खेळाडू म्हणून पुढे यावेत व त्यांनीही पदक जिंकावेत. असे झाले तर त्यासारखे दुसरे समाधान व आनंद कुठलाही नाही, असे जाधव यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.
ऑलंपिक स्पर्धेला काही दिवस उरले आहेत. कोरोनामुळे सर्व काही बदलले आहे. इच्छा असूनही प्रत्यक्षपणे भेटता आले नाही. परंतू, या स्पर्धेनंतर आपण वेळ काढून आपल्या निवासस्थानी सर्वांना निश्चितपणे भेटणार असल्याचे मोदींनी आवर्जून सांगितले. प्रविण जाधवशिवाय मेरी कोम, सानिया मिर्झा, दीपिका कुमारी, नीरज चोप्रा, दीपिका कुमारी, पीव्ही सिंधू या खेळाडूंनीही या चर्चेत भाग घेतला.