मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवरील 7 कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळवून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील रणजितसिंह डिसले यांना जगात भारताचा झेंडा फडकवला आहे. या पुरस्कारानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तर राजकीय नेत्यांकडून त्यांचा सत्कार केला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डिसले गुरुजींचा आपल्या निवासस्थानी सत्कार करत, त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मात्र निवासस्थानी बोलवून डिसले गुरुजींचा करण्यात आलेल्या सत्कारावरून भाजपकडून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करण्यात आली आहे.
थोडे कष्ट घेऊन परितेवाडी-बार्शी गाठली असती आणि डिसले गुरुजींचा सत्कार केला असता तर खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार झाला असता, असे म्हणत भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे.
त्या सत्कारमूर्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून केलेला सत्कार म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरली.
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 8, 2020
दरेकर यांनी ट्विट केले की, मुख्यमंत्री महोदय, शिक्षणमंत्री महोदया, थोडे कष्ट घेऊन परितेवाडी-बार्शी गाठली असती आणि डिसले गुरुजींचा सत्कार केला असता, तर तो खऱ्या अर्थाने गुरुजींचा, त्यांच्या कुटुंबाचा, शाळेचा, विद्यार्थ्यांचा, त्या परिसराचा सत्कार ठरला असता. जागतिक पातळीवर ज्यांनी राज्याचं नाव रोशन केलं, त्या सत्कारमूर्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून केलेला सत्कार म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरली, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार डिसले गुरुजींना मिळाला आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.