नवी दिल्ली : तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. गुरूवारी रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं.
यापूर्वी सोमवारी त्यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसंच लवकरच आपला राजकीय पक्ष सुरू करण्याबाबत माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता त्याच वेळी ही भेट झाली होती. नुकतेच तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात काही पोस्टर्स समोर आले होते. त्यामध्ये रजनीकांत यांना त्यांच्या राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, चर्चा केल्यानंतरच रजनीकांत यांनी राजकीय पक्षाचा विचार केला आहे. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत.