मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण सामना वृत्तपत्र वाचत नसल्याचे म्हटले होते. आमच्या नेते, संघटनावर टीका होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे असे नाना पटोले म्हणाले होते. आता यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले असून, नाना पटोलेंना जोरदार टोले लगावण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा एकदा दिसून आले आहे, अशा शब्दात सामना अग्रलेखातून नाना पटोलेंना टोला लगाण्यात आला आहे.
काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा ‘सामना’ने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही सामना वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
प. बंगालात पक्षाला खातेही उघडता आले नाही, यावर खंत व्यक्त केली गेली. आता सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त करणे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सवाल विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ट्विटरच्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे. पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे कोरोना काळात गर्दी करणे नाही. तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे, हे एक काम विरोधी पक्षांना रोज करावे लागेल. त्या कामी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे अग्रलेखात म्हटले आहे.
दरम्यान, सामना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलं आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर बरं, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असं कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं, असे नाना पटोले म्हणाले होते.
Read Also :
- ‘देशमुखांनंतर आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार’
- ‘भारत बायोटेक’च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना
- मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
- … त्यामुळे सीबीआय आणि ईडीकडून माझी चौकशी केली जात असावी – अनिल देशमुख