मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं समजतं. या प्रकरणी संजय राऊत आज दुपारी दोन वाजता शिवसेवा भवनात पत्रकार परिषदेत घेणार आहेत.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला. ‘मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला त्यांनी लगावला. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचं देखील ते म्हणाले.
शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आता ईडीने राऊत यांच्याकडे मोर्चा वळवल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राऊत यांनी ‘आ देखे जरा किस मे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया,’ अशा एका हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळींचे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला आहे.