रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यानेच दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणल्याने जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
आपल्या मतदारसंघात विविध कामांच्या कार्यक्रमाला निमंत्रण न देता सुनील तटकरेंकडून परस्पर उद्घाटनं केली जात आहेत. कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात नसल्याचे, योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराच्या विरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा प्रकार राज्यात पहिल्यांदाच होत आहे.
आमदार योगेश कदम यांच्या दापोली विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला आहे. माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम सातत्याने खासदार सुनील तटकरे करीत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण 20 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली.