मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले म्हणून त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल या तक्रारीचे गांभीर्याने दखल घेतल्याचं मत मांडलं होतं.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणा संबंधित सतत सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
“राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
“पोलीस विभाग चौकशी करेल. आमचं हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी”, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.
“मी काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं”, असं मत त्यांनी मांडलं