राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका ट्विटर हँडलवरून शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका करत ही धमकी देण्यात आली आहे.
राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरून पवार यांचा एकेरी उल्लेख करत “लवकरच तुझा दाभोळकर होणार” असे ट्विट करण्यात आले आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत.
दुसरीकडे सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाउंट वरून देखील अशाच प्रकारची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. खा सुप्रिया सुळे यांच्याकडून याबद्दल तक्रार दाखल करण्यात येणार आहे.