शिर्डी : भाविकांना साईबाबांचे आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवण्यात आली आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते या ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार सुजय विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसंच देशातील सर्व खासदार आणि राज्यातील सर्व आमदारांना साई ब्लेसिंग बॉक्स दिपावलीच्या शुभेच्छा म्हणून पाठवले आहेत.
या गिफ्ट बॉक्समध्ये महिला बचत गटांकडून खरेदी केलेल्या साईबाबांच्या विविध वस्तू असल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना यामुळे दिलासा मिळणार असून त्यांची दिवाळीदेखील गोड होणार असल्याचं माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
या साई ब्लेसिंग बॉक्समध्ये साई समाधीवरील फुलांपासून बनवेलेली अगरबत्ती, झेंडू फुलांपासून बनवलेला अष्टगंध, चित्रकार हेमंत वाणी यांनी रेखाटलेले साई कृपा दृष्टी चित्र, साई नामस्मरण सीडी, अगरबत्ती स्टँन्ड, गाईच्या गौरीपासून बनवलेले धुप, अगरबत्ती स्टँण्ड, मेणबत्ती, दिवा अशा नऊ वस्तूंचा समावेश आहे. हा बॉक्स 1500 रुपयांना देण्यात येणार असून ज्या भाविकांसाठी तो पाठवण्यात येणार आहे त्यांच्या नावाने साई संस्थानच्या अन्नदानासाठी 51 रुपयांची देणगी पावती सदर बॉक्समध्ये असणार आहे.