मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी, व्हिडीओ प्रसिद्ध करून भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.
“एका छोट्याशा निसटत्या विजयाने सरकार पाडण्याची भाषा करू नका. बंगालमधील जनतेने तुमचे थोबाड चांगलेच रंगवले आहे. त्यामुळे करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा करू नका. येत्या निवडणुकीत तुमचा संपूर्ण पराभव आम्ही करणार आहोत”, असा हल्लबोल त्यांनी केला होता.
तसेच, अहंकाराची भाषा बोलू नका. अशा अहंकारातून आलेली मस्ती जिरत असते हे पश्चिम बंगालच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे हे लक्षात घ्या.” असं वक्तव्य त्यांनी केले होते.
दरम्यान, मिटकरी यांच्या या विधानाला आता भाजपचे आमदार राम सातपुते यांनी आक्रमकपणे उत्तर दिले असून, आमदार मिटकरी हे बाजारू विचारवंत आहेत, अशी टीका करत त्यांनी, विजय हा विजय असतो. प्रचारात भाषा नीट वापरायची असते तरच विजय होत असतो. प्रचारसभेतील पिसाळलेली भाषा बंद करा. पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेने तुमचे तोंड काळे केले आहे. ते पुसून घ्या नीट आणि पराभव पचवायला शिका”, असे प्रत्युत्तर देखील त्यांनी मिटकरी यांना दिले आहे.