सध्या राज्यात कोरोना परिस्थिती असून देखील राजकीय घडामोडींनी देखील वेग घेतला आहे. महाविकासआघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सतत आरोप प्रत्यारोप होत असतात. तसेच विधानसभा निवडणुकीआधी अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप मध्ये प्रवेश केला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकींनंतर महविकासआघाडीच्या स्थापनेनांतर अनेक नेत्यांनी घरवापसी केली. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी गुलाबराव चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. त्यामुळे हा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवासस्थानी गुलाबराव चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते. मालवणमधील नारायण राणे यांच्या ‘नीलरत्न’ निवासस्थानी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुलाबराव चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गमधील स्थानिक नेते आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आदर्श मानणारे गुलाबराव चव्हाण, हे पवारांचे खंदे समर्थक होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.