मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम हाती घेतली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आणि विहंग सरनाईक यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन त्यांची दीर्घ काळ चौकशी करण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली.
भाजपा ईडीकडून दबाव आणत असेल, तर महाराष्ट्रात आमचं सरकार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि भाजपा नेत्यांनी कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहावं अशा आशयाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “खुशाल कारवाईला सुरूवात करा. कोणी संजय राऊतांचे किंवा सरकारचे हात किंवा पाय बांधलेले नाहीत. किंवा तोंडदेखील बांधलेलं नाही. संजय राऊत यांचं तोंड तर सदासर्वकाळ सुरूच असतं. उद्धव ठाकरेदेखील त्यांच्या तोंडाचा पट्टा थांबवू शकत नाहीयेत. संजय राऊतांच्या तोंडामुळे शिवसेनेचे केवढं नुकसान झालंय हे निवडणुकीत कळेल!
ईडी’च्या सध्या सुरू असलेल्या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्या. मग मी भाजपाच्या १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील नेते असतील. तेव्हा ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूया, असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. याविषयी बोलताना, “ही तर अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांनी अगदी त्वरित ही यादी संबंधितांकडे पाठवावी”, असं हसतहसत चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Also :
“क्रिकेटपटू झहीर खानला आमदार करा”, ‘या’ माजी मंत्र्यांची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी
‘अडचणीत आणाल तर आम्ही आणखी बळकट होऊ’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं भाजपला प्रत्युत्तर