येत्या ५ ऑगस्टला राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. देशातील निवडक नामवंतांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. सध्या याची तयारी उत्साहात सुरु आहे.
अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. येत्या 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र मंत्रोचाराच्या जयघोषात भूमिपूजन करतील. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल.
राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षातर्फे हा सोहळा दसरा दिवाळी सारखं आपआपल्या घरात साजरा करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे
५ ऑगस्ट रोजी सर्व हिंदूंनी आपल्या घरासमोर रांगोळी काढावी. तसेच सर्वांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन करावे. पूजन करण्यास येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येकाने घरात श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणावे. घरात रामभजन लावावे. प्रत्येकाने आपल्या घरच्या छतावर भगवा ध्वज लावावा. संध्याकाळी घरात, छतावर, अंगणात विद्युत रोषणाई करावी किंवा तेलाचे दिवे लावावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे