खासदार सुजय विखे यांनी के.के.रेंज प्रश्नावर नगर, पारनेर, राहुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नसल्याचे समोर आले आहे. तसेच बैठकीला असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावले नसल्याचेही फोटोमध्ये दिसून आले आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर विखे यांच्यावर टीका सुरू झाली होती.
या टीकेला उत्तर देताना विखे यांनी आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीला आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
‘माझ्या जिल्हाबंदीची मागणी काहीजणांनी केली. पण त्यांना माझे फोटो दिसत असतील, तर त्यांनी या जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांचे फोटो देखील पहावे. ते भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम घेताना माझ्यापेक्षा दुप्पट गर्दी करीत आहेत. परंतु दुर्देवाने सत्तेच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही. मी जनतेच्या कामासाठी फिरतोय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा आहे, तर मी पूर्णपणे तयार आहे असे म्हणत विखेंनी थेट विरोधकांना आव्हानच दिले आहे.
मात्र फक्त माझ्या एकट्यावर हा गुन्हा झाला नाही पाहिजे. तर जे पारनेरमध्ये कोविड हॉस्पिटल उद्घाटनाला आरोग्यमंत्री आले होते, त्यांच्यापासून सर्वांवरच गुन्हा दाखल व्हावा. कर्जत-जामखेडमध्ये तर रोज भूमिपूजन होतात. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा. केवळ एका खासदाराला टार्गेट करून उपयोग नाही. त्यामुळे माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल झाल्यास, मी या सर्वांवर ही गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार, ‘ असे सुजय विखे यांनी स्पष्ट केले.