मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका असून मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे. मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. पण सोबतच हा अंतरिम निर्णय असून याचं भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असे सांगितलं होते.
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.