दिल्ली : सतत चर्चांवर चर्चा, दीर्घकाळ चालणाऱ्या बैठका, राज्याराज्यांत आणि परराज्यांत होणार दौरे, पत्रकार परिषदा, भाजपविरुद्ध देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांना एकत्र आणून त्यांची मोट घट्ट बांधून ठेवण्यासाठी सातत्याने सुरु असलेली धावपळ, राजकीय भेटीगाठी आणि बरंच काही..ही आहे पवार साहेबांची वयाच्या ८१व्या वर्षी असलेली दैनंदिनी. पण यातूनही ते आपल्या कुटूंबासाठी वेळ काढून ठेवतात. त्यांच्यासोबत निवांत आणि, राजकारणाच्या मैदानापासून लांब जाऊन वेळ घालवतात.
सध्या पवार साहेब, सुप्रिया ताई आणि कुटुंबियांचे असेच काही निवांत क्षणांचे फोटो, सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमांवर पाठवले आहेत. यात पवार कुटुंबियांच्या मागे ताजमहाल दिसत असून, पवार साहेबांसोबत त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे आणि नातवंड दिसत आहेत.
त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात, महाविकास आघाडीवर आलेलं राजकीय वादळ स्वतःच्या हिंमतीवर आणि अनुभवांवर थोपवून धरलेला हा नेता, इतक्या सगळ्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींमध्येही आपल्या कुटुंबाला वेळ देतो, यातूनच पवार कुटुंबीयांचं एकमेकांवर असलेलं प्रेम दिसून येत आहे.
त्यामुळे राज्यात जरी सध्या वाझे, हिरेन, परमबीर सिंग, अनिल देशमुख आणि ताजं फोन टॅपिंग या प्रकारणांनी राजकीय वातावरण तापलेलं असलं आणि घटक पक्षातल्या काही नेत्यांचे धाबे, त्यामुळे विरोधकांनी दणाणून सोडले असले, तरी महाविकास आघाडीचा हा “कॅप्टन कूल” नो टेन्शन मोड मध्ये जाऊन, “राज्यातलं सरकार स्थिर आहे आणि पाच वर्षांचा कार्यकाळ ते पूर्ण करेल, ज्यांचा सरकार अस्थिर करण्याचा डाव आहे तो यशस्वी होणार नाही,” असे वक्तव्य करून, डोक्यात कोणती राजकीय रणनीती आखत असेल आणि आता पुढे काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.