IMPIMP
sarfaraj ahamad sarfaraj ahamad

मोहम्मद पैगंबरांची बाजार व्यवस्था

सरफराज अहमद : अलाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी अर्थशास्त्रावर आधारीत असल्याचे म्हटले आहे. इस्लामी तत्वज्ञानामुळेच या नव्या संकल्पनेने जन्म घेतल्याची पुष्टीही त्याने आपल्या लिखाणाला जोडली आहे.

प्रेषित मदिनेत असताना त्यांनी ‘दारुल अदल’ सारख्या आर्थिक शोषण नाकारणाऱ्या बाजाराची स्थापना केली होती. हे बाजार मसजिद ए नबवीच्या शेजारी होते. या बाजाराविषयी प्रेषितांनी त्यावेळी भूमिका मांडताना म्हटले होते, ‘हे तुमचे स्वतःचे बाजार आहे. इथे कुणीच तुमच्याशी जबरदस्ती अथवा फसवणूक करणार नाही. कुणीच तुमच्याकडून जुलमी करदेखील घेणार नाही.’ या बाजाराच्या आधारे प्रेषितांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावला होता.

इब्ने खल्दून हा इस्लामप्रणित प्रगत अर्थशास्त्राचा व्याख्याता मानला जातो. त्याच्या मते, ‘बाजारातील शोषण संपवून इस्लामने सामान्यांच्या जगण्याला आधार दिला. बाजारात श्रमाचे मुल्य, वस्तूंचे मुल्य आणि नफ्याविषयी इस्लामने मांडलेला सिध्दांत शोषणव्यवस्थेला संपवणारा ठरला. इस्लाम हा नव्या जगातील माणसांसाठी माणूसकीचा संदेश घेऊन आला होता. कारण त्याने जीवनासाठी गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देणारी बाजारपेठ त्याच्यासाठी सुकर केली होती.’ इस्लामने मांडलेला श्रममुल्याचा सिध्दांत हा बाजारातील मुजोर व्यापारी आणि उत्पादन करणाऱ्या धनदांडग्यांना उघड आव्हान होते. श्रमिकांना सन्मान देण्यासाठी इस्लामने सक्तीची धर्मकर्तव्ये म्हणून काही नियम केले. नफा ठरवणारी अनियंत्रीत व्यवस्था मोडीत काढण्यासाठी इस्लामने नफ्याचे प्रमाण ठरवून दिले.

प्रेषित मोहम्मद (स.) यांनी मक्का शहराच्या समाजजीवनात इस्लामच्या स्थापनेआधी केलेला पहिला हस्तक्षेप हा बाजारातील शोषणाविरोधात होता. प्रेषितत्वापुर्वी मोहम्मद (स.) यांनी ‘हल्फूल फुदूल’ हा करार मक्का शहराच्या बाजारात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी घडवून आणला होता. बाजारातील अर्थकारण, व्यवस्था, व्यवहार हा प्रेषितांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. प्रेषितांनी केलेल्या बाजाराच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. यासीन मजहर सिद्दीकी लिहीतात, ‘बाजाराचे व्यवस्थापन हे शासनव्यवस्थेचा प्रमुख म्हणून इस्लामी राज्याच्या प्रमुखाचे कर्तव्य होते. प्रेषित वचनसंग्रहातून हे सिध्द होते की, प्रेषित स्वतः बाजारांचा दौरा करायचे.

व्यापऱ्यांच्या वर्तनाचे निरिक्षण करीत. वस्तूंच्या दरातील चढ-उतार, श्रमिकांची स्थिती वगैरेंची माहिती घेत. ‘तिरमिजी’ या प्रेषित वचनसंग्रहात एक प्रसंग नोंदवला आहे. प्रेषित एकदा बाजारातून जात होते. त्यांनी एकेठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाचे ढिग पाहिले. प्रेषितांनी त्या ढिगाऱ्यात हात घातला. गव्हू ओलसर असल्याची त्यांना जाणीव झाली. प्रेषितांनी त्या व्यापाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. आणि ग्राहकांशी धोकेबाजी करण्यास मनाई केली.’

प्रेषितांनी बाजारात दलाली आणि दरांमधील कृत्रीम चढउतार रोखण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात एकाच ठिकाणी उत्पादक व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करण्यास मनाई केली होती. खरेदीची ठिकाणे व विक्रीची ठिकाणे अलग करण्यात आली होती. व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या धोकेबाजी, मनमानीला लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे काही इस्लामी विद्वानांचे मत आहे. याकरीता प्रेषितांनी बाजाराचा प्रमुख म्हणून आधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.

मक्काविजयानंतर तत्काळ प्रेषितांनी बनु उमैय्या वंशाच्या सईदी घराण्यातील सआबद बिन सईद यांना मक्का शहराच्या बाजारात आधिकारी म्हणून नियुक्त केले होते. मक्का शहराचे अर्थकारण, बाजारपेठेवरील नियंत्रणासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्वाची होती. याप्रमाणेच हजरत उमर यांना मदिनेच्या बाजाराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्याकाळात व्यापारी मदिनेच्या बाजाराला अतिशय महत्व देत.

मदिनेची बाजारपेठ त्याकाळात अनियंत्रीत होत चालली होती. देश-विदेशातील व्यापारी तेथे व्यापारास येत होते. त्यामूळे मदिनेच्या बाजारावरील उमर यांची नियुक्ती महत्वाची मानली जाते. ज्या बाजारात प्रमुखाची नियुक्ती केलेली नव्हती, त्याचे व्यवस्थापन त्या प्रदेशाच्या प्रमुखाकडे दिले होते.

बाजारात सट्टेबाजारीवर प्रतिबंध घालण्यात आले होते. मदिनेच्या बाजाराची सुरुवात करताना प्रेषितांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते, ‘आमच्या या बाजारात कुणी साठेबाजारी करु नये. असे करणाऱ्याला तीच शिक्षा दिली जाईल जी अल्लाहच्या संदेशात प्रक्षेप करणाराला दिली जाते.’ बाजारातल्या तोलन-मापनातली अनियमितता दुर केली होती. कुरआननेच याविषयी स्पष्ट आदेश दिला आहे. सुरह अल्‌ मुतअफीन मध्ये काटा मारणाऱ्या आणि वस्तूंचे वजन कमी तोलणाऱ्यांची निंदा करण्यात आली आहे. याविषयी कुरआनमध्ये अनेक नियम सांगितले आहेत.

लेखक : सरफराज अहमद