सांगली : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. जयंत पाटील आणि ‘करेक्ट कार्यक्रम’ हा शब्द तसा राजकीय पटलावर परिचित आहे.
जयंत पाटील यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा कायमच या शब्दप्रयोगासोबत होते. स्वतः जयंत पाटील यांच्याकडूनही ‘करेक्ट कार्यक्रम करतो’ हा शब्दप्रयोग नेहमी होतो. आता पुन्हा एकदा हा शब्दप्रयोग सांगलीत चर्चेचा विषय ठरला आहे. सांगलीत सध्या याच आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत.
सांगलीतील या पोस्टर्सवर ‘किंग मेकर जे आर पी अर्थात जयंत राजाराम पाटील’ असा मथळा आहे. त्याच्या खालीच “आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच” असं लिहिण्यात आलं आहे. नुकत्याच पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये महाविकासआघाडीचा दणदणीत विजयी झाला आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड हे मोठ्या फरकाने विजयी झाले.
त्यामुळे या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पुन्हा एकदा किंगमेकर असा उल्लेख होण्यास सुरुवात झाली. जयंत पाटील यांचा किंगमेकर असा उल्लेख करणारे अनेक मेसेज मीडिया आणि सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
सांगली महापौर निवडणुकीत आघाडीकडून भाजपला चितपट करण्याच्या हालचाली
दुसरीकडे सांगली महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असली तरी येथे भाजपला काठावरचं बहुमत आहे. दोन महिन्यानंतर महापौरपदाची निवड होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी चमत्कार करणार असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने पोस्टर्स झळकल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Read Also :
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची सु्प्रीम कोर्टात धाव
‘महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याप्रमाणे केंद्रात आघाडी…,’ संजय राऊतांचं सूचक विधान
‘…तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा’, ममता बॅनर्जींनी उडवली भाजप नेत्यांची खिल्ली