नागपूर : नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आलेली आहे. मुंढेच्या बदलीवरून बरीच चर्चा रंगली होती. याच वेळी त्यांना कोरोनाची लागण देखील झाली होती. मात्र आता त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सर्वकाही ठीक असल्याचे म्हटले आहे. आपण विलगीकरणात राहून सर्व दिशानिर्देशांचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंढेंनी फेसबुक पोस्ट करत म्हटले की, मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना 24 ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंगद्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे.
ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटीव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.