पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली असून या मुलाखतीतच पवारांनी मोदींच्या भेटीसंदर्भातील खुलासा केला आहे.
महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यामध्ये सत्तावरुन निर्माण झालेल्या गोंधळाच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मध्यस्थी करुन राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला पाठिंबा देईल असा विचार महाराष्ट्रातील भाजपा नेते करत होते असंही पवारांनी म्हटलं आहे.
“देशाच्या प्राधानमंत्र्यांसमोर आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वत: संसदेमध्ये पंतप्रधानांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. जमल्यास आम्ही शिवसेनेबरोबर सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू. पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही असं मी त्यांना सांगून आलो,” असं पवारांनी म्हटलं आहे.