पंढरपूर – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या रविवारी निकाल लागणार आहे. या निवडणुकी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 340889 मतदारांपैकी 225498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 66.15 टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं. पंढरपुरात प्रचंड मतदान झाल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
उद्या रविवारी सकाळी 8 वाजता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होईल. तसेच दुपारी 3 वाजेच्या आत या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशिर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.