नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पीएम केअर्स फंडची सुरुवात करण्यात आली होती. 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर 27 मार्चला या फंडची सुरुवात केली होती. या फंडमध्ये कोट्यावधी रुपये देणगी करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने आता या फंडची माहिती सार्वजनिक केली असून, केवळ 5 दिवसात यामध्ये तब्बल 3076 कोटी रुपये जमा झाले आहेत.
पीएम केअर्स फंडद्वारे देयक आणि जमा केलेल्या 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ऑडिट अहवालातून ही माहिती प्राप्त झाली आहे. 27 मार्च ते 31 मार्च 2020 दरम्यान 3076.6 कोटी रुपये जमा झाले. यामध्ये 39.6 लाख रुपये परदेशी देणगी आहे. या रक्कमेवर जवळपास 35 लाख रुपये व्याज देखील मिळालेले आहे. मात्र ही रक्कम कोणी दिली त्या देणगीदारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
31 मार्चनंतरच्या देणगीचा अहवाल या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर म्हणजे एप्रिल 2021 मध्ये किंवा त्यानंतर येण्याची शक्यता आहे.