IMPIMP

काँग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा सर्वाधिक गैरवापर, फडणवीसांची जोरदार टीका

सावंतवाडी : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्येस आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजप ईडीचा वापर करून दबाव निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता या आरोपाला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा सर्वाधिक गैरवापर झाला असल्याचे म्हटले आहे.

ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते. तुम्ही काही केले नाही तर घाबरता कशाला ? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

फडणवीस म्हणाले की, तुम्ही काहीही केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही.भाजपने कोणत्या ही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळातच ईडीचा सर्वाधिक गैरवापर झाल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्य सरकारच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली आघाडी सरकार मूठभर लोकांना लाभ पोहोचवण्याचे काम करीत असून यामुळे राज्याचे हजारो कोटी रूपयांचे नुकसान होणार असून हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

याविषयी बोलताना ते म्हणाले की, बांधकाम क्षेत्राबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. यातील घोटाळे मी स्वत: उघडकीस आणले आहेत. त्याची चौकशी करावी, अन्यथा मला उच्च न्यायालयात जावे लागेल, अशा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.