पुणे : रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नाही असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनी आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, असे प्रत्त्युत्तर दिले होते. या शाब्दिक चकमकीत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काही माणसांना प्रसिद्धीच मिळत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोठ्या व्यक्तींवर टीका केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा व्यक्तींना प्रसार माध्यमांनी समजून सांगायला हवे की, टीका केल्याखेरीज देखील आम्ही तुम्हाला कव्हरेज देऊ. मग ते कदाचित टीका करणे बंद करतील. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोठ्या नेत्यांवर टीका करत असतात.
पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवर देखील जोरदार निशाणा साधला.