औरंगाबाद : काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे बुधवारी (ता. दोन) सकाळी ६.३० वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. तालुक्यातील दहेगाव येथे १९७० साली सरपंच पदापासून आपल्या राजकरणाचा श्रीगणेशा करणारे रामकृष्ण बाबा यांच्या कारकिर्दीला खरा बहर आला तो १९८५ साली. त्यावर्षी त्यांनी वैजापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले.
काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांची प्रकृती मधुमेहाच्या त्रासामुळे काही दिवसांपूर्वी खालावली होती. त्यामुळे त्याना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सायंकाळी ४ वाजता दहेगाव (ता. वैजापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
सध्या औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अप्पासाहेब पाटील, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील ही दोन मुले आहेत.
१९९९ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर खासदारकी मिळवली.रामकृष्ण बाबांनी पंचायत समितीचे सभापती पद, तर २५ वर्ष जिल्हा बैंकेचे चेअरमन म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट कॉप-आप बैंकेचे पाच वर्ष संचालक म्हणूनही बाबांनी काम केले.