नवी दिल्ली: पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या चॅट प्रकरणावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अर्णव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. गेल्या काही दिवसात आपण धक्कादायक बातम्या वाचल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळल्या जातयं हे आपण पाहिलं आहे. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया गांधी यांनी चढवला.
गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारला खासगीकरण करण्याची प्रचंड घाई झालेली दिसतेय, असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला आहे.
यावेळी शेतकरी आंदोलनावरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मोदी सरकारने अहंकार आणि संवेदनाहिनतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारने कृषी कायदे घाईघाईत मंजूर केले. हे कायदे समजून घेण्यासाठी विरोधकांना संधीच दिली नाही आणि आता शेतकऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. काँग्रेसने सुरुवातीलाच हे तिन्ही कायदे फेटाळून लावले होते. या कायद्यातून एमएसपीपासून ते अन्न सुरक्षेपर्यंतचे प्रश्न उपस्थित होत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
Read Also
मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेने मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले…
जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर शरद पवारांनी केली मिश्किल टिप्पणी