गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जनाबाबत सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेऊन पोलीस विभाग व महापालिका प्रशासनाने योग्य ते नियोजन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता घरगुती स्वरुपात विसर्जन करणे, तसेच फिरते विसर्जन हौदाची व्यवस्था करणे तसेच गणेश मुर्तीं दान केंद्रे स्थापन करण्यात आले असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी, तपासण्यात आलेल्या बिलांचे व्यवस्थापन, बेड व्यवस्थापन आदि विषयी माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील ‘कोरोना’ स्थितीची माहिती दिली. ग्रामीण भागात अँटीजेन टेस्ट वाढविण्यात येत असल्याचे सांगितले तसेच ज्येष्ठ नागरिक व सहव्याधीग्रस्तांच्या तपासणीवर भर देवून रुग्णदर,मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून यामुळे ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईल असे सांगितले.