नाशिक : कोरोना व्हायरसची लागण झालेली रुग्ण संख्या कमी झालेली असली तरीही, अद्याप पूर्ण संकट टळलेले नाही. अशात लग्नसमारंभास उपस्थित राहण्याची नियमावली अजूनही लागू आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी लागू असणाऱ्या या नियमावलींची लोकप्रतिनिधींकडून अंमलबजावणी होताना दिसत नाहीये.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचा विवाहसोहळा पार पडला. मात्र लग्नात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहण्यास मिळाले. विशेष म्हणजे लग्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते.
दिलीप बनकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांच्या मुलाच्या लग्नात लोकप्रतिनिधींसह, अनेक मोठे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पुरती पायमल्ली करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग न पाळता लोक एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीचे माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांचा विवाह पुण्यात पार पडला. या लग्नात देखील कोरोनाचे नियम दाब्यावर बसवण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेते उपस्थित होते.