नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते मागील अनेक वर्षांपासून कोमामध्ये होते. 2014 साली त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. ते ८२ वर्षांचे होते. जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.
भाजपाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असलेल्या जसवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. 1996 ते 2004 यादरम्यान त्यांनी संरक्षण, परराष्ट्र आणि वित्त मंत्राालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते. 2014 मध्ये भाजपनं सिंह यांना बाडमेर मंतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी तिकिट नाकारले होते. त्यावेळी नाराज झालेल्या जसवंत सिंह यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.
Jaswant Singh Ji served our nation diligently, first as a soldier and later during his long association with politics. During Atal Ji’s Government, he handled crucial portfolios and left a strong mark in the worlds of finance, defence and external affairs. Saddened by his demise.
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत ट्विट केले की, जसवंतसिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्द्यांची जगभरात एक छाप सोडली, त्यांच्या निधनानं दुःखी आहे.