पुणे : खेड पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा वाद अखेर पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज खेडमध्ये दाखल झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला.
महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, खेडमध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालावे, असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिला
खेड पंचायत समितीचा नेमका वाद काय?
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे ८ सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला ९ महिने बाकी असतानाच पद मिळविण्याची चढाओढ सुरू झाली आहे. सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचं चव्हाट्यावर आला आहे. सर्व पक्षीय १४ पैकी ११ सदस्यांनी आणि सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती मिळाली असून, यात राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांचा सहभाग असल्याचंही बोललं जातं आहे. तर दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Read Also :