पुणे : खेड पंचायत समिती सदस्यांच्या पळवापळवीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरु असताना खेडमध्ये जे घाणेरडं राजकारण सुरु आहे, ते आघाडीला शोभा देणारं नाही. जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना करावा, नाहीतर शिवसेनेकडे हा विषय सोपवावा, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर खेड पंचायत समितीच्या नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य पुन्हा सहलीवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आज थेट खेड शिवसेना कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे. पंचायत समितीच्या जागेवरुन हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करु नका, शिवसेना उत्तर देईल. पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेलं, दहशतीने पळवून नेलं. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
खेड पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचं हे आम्ही पाहू. मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येईल, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पळवून नेल्याच्या प्रकारानंतर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे अजित पवारांनी लक्ष द्यावं. त्यांना हे शक्य होणार नसेल तर त्यांनी हा विषय शिवसेनेकडे सोपवावा. शिवसेना काय ते बघून घेईल, असंही संजय राऊत म्हणाले.
Read Also :
- कोरोनाकाळात मोर्चे काढून लोकांच्या जीवाशी खेळू नका – अजित पवार
- अजित पवारांच्या बारामतीतच भ्रष्टाचाराचा सुळसुळाट; खुले आम घेतले जातायेत पैसे
- उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे
- अदिती चांगलं काम करतेयं, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो