पुणे : जनरल मोटर्स इंडिया या ऑटोमोबाईल कंपनीने आपला भारतातील तळेगाव दाभाडे येथील शेवटचा प्लँट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीनमध्ये वाढत्या तणावामुळे कंपनी हा प्लांट बंद करत आहेत.
जनरल मोटर्स त्यांचा प्लांट चीनची कंपनी ग्रेट वॉल मोटर्सला विकू इच्छिते. पण, सरकारने या कराराला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता कंपनीने प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्लांटमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार महेश लांडगे या कर्मचाऱ्यांसाठी पुढे आले असून, या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवले आहे.
महेश लांडगे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, जनरल मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 17 जानेवारी 2020 रोजी कामगारांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता चीन देशातील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीला विकत असल्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र शासनाने जनरल मोटर्स व चिं च्या ग्रेट वॉल मोटर्स सोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत MOU केला आहे . परंतु सध्यस्थिती केंद्र शासनाकडून परवानगी मिळणे अडचणी झाल्यामुळे जनरल मोटर्सने २० नोव्हेंबर २०२० रोजी तळेगाव प्लांट बंद करण्यासाठी उद्योग विभाग , महाराष्ट्र शासन यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे .
दोन्ही घटना परस्पर विरोधी असल्यामुळे कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये कंपनीमधील 1578 कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवणेबाबत संबंधितांना योग्य ते आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.