महापौर, सत्तारुढ पक्षनेते, स्थायी समिती सभापतींचा बैठकींचा सपाटा
पिंपरी चिंचवड : कोरोना काळात शहरातील विकासकामांवर ‘संक्रांत’ आली. प्रभागांमधील प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. आगामी निवडणुकीत लोकांसमोर जाताना विकासकामे पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी प्रभागातील प्रमुख प्रकल्प पुढील वर्षभरात पूर्ण व्हावेत, अशी सर्वपक्षीय नगरसेवक- पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे केली.
पिंपरी-चिंचवडमधील विकासकामांबाबत महापालिका भवन येथे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य आरोग्य अधिकारी अनिल रॉय, सहायक वैद्यकीय अधिकारी गोफणे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२८ लोकनियुक्त नगरसेवक (पैकी ३ नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे) आणि ५ स्वीकृत नगरसेवक पिंपरी-चिंचवडकरांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. आता आगामी महापालिका निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. प्रत्येक नगरसेवकाला निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा, विरोधी पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांना आपल्या प्रभागातील कामे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे शहरातील विकासकामांवर टाच आली आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, २०२२ मध्ये प्रत्येक नगरसेवकाला निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेवर होणारा खर्च पाहता प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात किमान एक काम लक्षवेधी व्हावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. तशी संधी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी उपलब्ध करुन द्यावी. कारण, कोरोनामुळे विकासकामांवर खर्चाची मार्यादा आली. त्याचा परिणाम प्रगतीपथावर असलेली विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नकारात्मक सूर आहे. त्याचा फटका सर्वपक्षीय नगरसेवकांना बसू नये, अशी आमची अपेक्षा आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कोरोना काळातही नगरसेवकांना विकासकामे पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्येक प्रभागातील एक लक्षवेधी काम पूर्ण करण्याची संधी नगरसेवकांना दिली पाहिजे.
सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांची बैठक
विकासकामांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्यांची बैठक लवकर घेण्यात येणार आहे. या बैठकीत प्रलंबित विकासकामे पूर्ण करणे आणि पुढील कामांची दिशा ठरवणे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात लक्षवेधी ठरेल, असे काम पूर्ण करता येईल, याचे नियोजन करण्यात येणार आहे.
महापौरांच्या नेतृत्त्वात सर्वसमावेशक विकास
महापालिका आयुक्त हे प्रशासकीय प्रमुख असले, तरी लोकांनी निवडून दिलेले महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये राजकीय मतभेद विसरुन विकासकामे मार्गी लागली पाहिजेत, असे आदेश आमदार लांडगे यांनी दिले आहेत. यावर महापालिका आयुक्तांनी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासोबतच नगरसेवकांनी सुचवलेले प्रभागातील लक्षवेधी विकासकाम पूर्ण करण्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करावे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
Read Also :
- ‘वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका’, भातखळकरांचे रोहित पवारांवर टीकास्त्र
- बुलढाण्यातील 138 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नसल्याचा प्रशासनाचा दावा, मात्र परिस्थिती वेगळीच
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण
- कोरोनामुक्तीचा हिरवे बाजार पॅटर्न, पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल