मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून बहुमताची चाचणी करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. यानंतर आता भाजपने देखील आपली यंत्रणा सक्रिय केली आहे. राज्यभरातील सर्व आमदारांना उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंडखोरी केली आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून या सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश देण्याची मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली तसेच सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करण्याचे पत्र यावेळी देण्यात आले, यानंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे.
भाजपने आपल्या सर्व आमदारांना तसेच सहयोगी आमदारांना उद्या सकाळी मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुमत चाचणी लवकरच पार पडणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. दुसरीकडे गुवाहाटीमध्ये शिंदे समर्थक आमदारांची देखील महत्त्वाची बैठक सुरू आहे, या बैठकीमध्ये पुढील रणनीती काय असावी यावर चर्चा केली जात आहे.