शिर्डी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आला होता मात्र सरकारकडून करण्यात आलेल्या अनलॉक प्रक्रियेत अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र मंदिर उघडण्याबाबत सरकारचा निर्णय झालेलं नाही. आता भाजप खासदार सुजय विखे यांनी मंदिर खुली करण्याबाबत इशारा दिला आहे.
“कोविड सेवेत असलेल्या कंत्राटी कामगारांना अधिक मोबदला देण्याऐवजी त्यांची वेतनकपात केली. समितीचे सदस्य स्वतःचा पगार कमी करणार आहेत का? साई संस्थानचे काम पाहणारी समिती अधिकारांचे उल्लंघन करते. सरकारने यापूर्वी घेतलेले निर्णय फिरविण्याचा अधिकार समितीला नाही. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना गेल्या तीन महिन्यांपासून वेळ देत नाही. आठ दिवसांत वेळ दिला नाही, तर समिती सदस्यांच्या कामकाजाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू. असा इशारे विखेंनी यावेळी दिला आहे.
साई संस्थानच्या 598 कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणे संस्थान आस्थापनेवर घ्यावे. कोविड सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात मागे घ्यावी. केंद्र सरकारप्रमाणे संस्थान कर्मचाऱ्यांच्या ग्रच्युईटीबाबत निर्णय करावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन आज संस्थान कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे डॉ. विखे पाटील यांना देण्यात आले. कामगार संघटनेचे नेते राजेंद्र जगताप, तुषार शेळके, राजेंद्र कोते, प्रताप कोते, विलास गोंदकर, यादवराव कोते आदी उपस्थित होते. या वेळी विखे पाटील बोलत होते.