मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र रद्द केल्याने आता त्यांची खासदारकी जाण्याची शक्यता आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि फसवणुकीने राणा यांनी हे प्रमाणपत्र मिळवले असल्याचा निष्कर्ष नोंदवत जातवैधता प्रमाणपत्र सहा आठवड्यात जात पडताळणी समितीकडे परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आता यावर बोलताना नवनीत राणा यांनी खासदारकीला कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे.
आपण उच्च न्यायालयाच्या आदेशाचा पूर्ण आदर करतो. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, गेल्या आठ वर्षांपासून अमरावती जिल्हयातील नागरिकांच्या सेवेत आपण अविरतपणे झटत असून खासदार म्हणून गेल्या 2 वर्षात आपण आपल्या जिल्ह्याचे, शेतकरी शेतमजूर,गोरगरीब, व्यापारी व महिला-विद्यार्थी यांच्या हिताचे अनेक प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडले. कोरोनाकाळात आपण जिल्ह्यांतील लाखो लोकांची अहोरात्र सेवा केली.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन एक महिला म्हणून मला त्रास देण्याचे, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे व माझे खच्चीकरण करण्याचे काम केले असून हे एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राणा यांनी केला.
दरम्यान, उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी न्यायालयाने नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
Read Also :
- पुण्यात फॅक्टरीला आग लागून मोठी जिवितहानी, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींनी मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली’
- ‘पवारांच्या ड्रावरमधून पत्र चोरताना टॉर्च मारण्यासाठी अजितदादांबरोबर भाजपची कोण-कोण लोकं होती?’
- ‘महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, काय दिवे लावले या कर्मदरिद्री सरकारने?’