मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. ज्या भागात कधी पाणी साचत नव्हते तो भाग देखील यंदा पाण्याखाली गेला आहे. दक्षिण मुंबईत तुंबलेलं पाणी पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अचंबित झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय असे पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटरमधून घरी जात असताना सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी पाणी पाहून दोघेही जण आवाक झाले. “मी पहिल्यांदा आयुष्यात इथे या भागात पाणी तुंबलेलं पाहतो आहे,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, काल मुंबईत पावसाने मागील 46 वर्षांचा विक्रम मोडला आहे. संततधर पावसाने हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन या भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले. मात्र कधीही पाणी न साचणाऱ्या नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह, चर्नी रोड यासारख्या दक्षिण मुंबईतील भागात देखील पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.