प्रतिनिधी/ ओंकार गोरे
पिंपरी चिंचवड : सलग पंधरा वर्षे एकहाती सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादीला विठ्ठल-रुख्मिणी मुर्ती खरेदी घोटाळ्यात भाजपने घेरा घातल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली. पिंपरी चिंचवडला भ्रष्टाचारमुक्त शहर बनविण्याच्या मुद्यावर शड्डू ठोकत भाजपने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता खेचून आणली. त्यामुळे भाजपच्या दोन्ही आमदाराचे शहरातील वजन वाढले. २०२२मध्ये होणारी महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली असताना भाजपच्या दोन्ही आमदाराला हरवून राष्ट्रवादीला आपला बालेकिल्ला पुन्हा हस्तगत एवढे सोपे नसल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पिंपरी चिंचवडच्या राजकीय रणांगणात उतरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी २०२२ ची पिंपरी महापालिका निवडणुक किती महत्वाची आहे, हे दिसत आहे. त्यामुळे, भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे निवडणुकीसाठी काय नवी रणनिती आखणार? राष्ट्रवादी प्रमाणे भाजपचे वरिष्ठ नेते पिंपरी चिंचवडमध्ये हजेरी लावणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
आगामी महापालिका निवडणुका फेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा काजीब करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांचे सुपुत्र पार्थ पवारांनीही शहरात हजेरी लावत भाजपच्या भ्रष्टाचाराचे गुऱ्हाळ उकलण्यास सुरूवात केली आहे. परंतू, २०१७ मध्ये एकहाती सत्ता खेचून आणणारे भाजपचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप २०२२लाही सत्ता कायम ठेवण्यासाठी दोन्ही पाय घट्ट रोवून बसले आहेत. त्यामुळे, दोन्ही आमदारांना शहरातून हालवणे सहज सोपे नसल्याचे कळू लागल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये हजेरी लावली. एवढेच नव्हे तर काल झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनीही हजेरी लावली. त्यामुळे, राष्ट्रवादीसाठी पिंपरी चिंचवडची निवडणुक किती महत्वाची आहे, हे यातून दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीच्या नेतृत्वात माजी आमदार विलास लांडेंना अखेर डच्चू?
दरम्यान, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत लूट करणाऱ्या भाजपला दूर करा, असे आवाहन शरद पवारांनी केले. तर, गेल्या साडेचार वर्षातील भाजपची भ्रष्टाचार मुक्त दहा कामे दाखवा, असा दावा खासदार कोल्हेंनी केला. मुळात राष्ट्रवादी पुन्हा आगामी महापालिका निवडणूकीसाठी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर दावे करत असताना २०१७ च्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादीला का डावलले? असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच महत्वाचे म्हणजे, २०१५ साली तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने विठ्ठल-रुख्मिणी मुर्ती खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचे बोलले जाते. तोच मुद्दा भाजपने लावून धरल्याने पिंपरी चिंचवडकरांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरविल्याचे बोलले जाते. त्यामुळे भ्रष्टाचार करणारी राष्ट्रवादी पुन्हा भ्रष्टाचाराच्या मुद्यावर निवडणूक लढवून काय साध्य करणार? असाही प्रश्न निर्माण होतो.
पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
आता विषय राहतो तो शरद पवारांच्या पिंपरी चिंचवडमधील हजेरीचा. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहता भोसरीतून माजी आमदार विलास लांडेच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात बॅकफुटला गेली आहे. पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादीचा आमदार अण्णा बनसोडे यांचे वर्चस्व असले तरी महापालिका त्यांचा दरारा दिसून येत नाही. दरम्यान, भाजपच्या दोन्ही आमदारांनी शहराचे दोन भाग केले असल्याचा दावा पवारांनी केला. असे असले तरी पक्ष मजबुत कऱण्यासाठी आमदार लांडगे आणि जगताप “पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट” मुद्यावर एकत्र येत राष्ट्रवादीला कसे मागे खेचायचे याची चांगलीच जाण आहे. परंतू, अशक्य ते शक्य करणाऱ्यामध्ये पवारांच्या नावाचा डंगा वाजतो. उदाहरणार्थ, २०१९ च्या निवडणुकीत साताऱ्यात भर पावसात सभा घेवून पवारांनी राष्ट्रवादीला आव्हान देणाऱ्या उदयनराजेंना पराभवाची धुळ चारली होती. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या राजकारणात पवारांनी पाऊल ठेवल्याने पिंपरी चिंचवडमध्ये आगामी निवडणुकीत पवारांच्या सभेमध्ये पाऊस हजेरी लावणार का? पाऊसला अडवण्यासाठी भाजप काय नवी रणनिती आखणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Read Also :
- तीन हजार रोख, मटण-मासे पार्टी, पत्ते खेळायला पैसै! शिवसेना आमदाराने उलगडलं निवडणुकीचं गणित
- गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
- भाजपला पडली मोठी खिंडार; येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला; भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा रोख कुणाकडे?
- सत्ता कोणाचीही असो, अंगावर घेण्याची ताकद फक्त आमच्यातच – निलेश राणे