मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया तसंच अभिनेत्री कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आपण हक्कभंग प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्याचं दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु असून यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा फेटाळून लावत त्यावरही भाष्य केलं.
अभिनेत्री कंगना रणौतने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे,” असं प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.
ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अभिनेत्री कंगना रणौत यांनी माझ्याविरोधात खोटं ट्विट केलं. यामुळे कंगना रणौत तसंच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीला सर्वतोपरी आम्ही सहकार्य करत आहोत. ज्यावेळी चौकशीची गरज असेल, शंका असतील त्या निरसन करण्यासाठी दोन तासात हजर राही असं मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली आहेत आणि भविष्यातही देत राहीन”.
“पण प्रताप सरनाईकांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं, राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागीदारी असल्याची कागदपत्रं मिळाली अशा प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसिद्द करुन माझी आणि कुटुंबीयांची बदनामी करणाऱ्या कंगनाविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे.
भविष्यात अजून बातम्या मिळतील, पण हे बदनामी करण्याचं कटकारस्थान आहे,” असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. हक्कभंग प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी द्यावी अशी विनंती मी केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. “ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु?,” असा सवालही यावेळी त्यांनी विचारला.
Read Also :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित
‘रवी राणांचा पोशाख पाहून अध्यक्ष भडकले आणि त्यांना बाहेर काढले’
गोपीचंद पडळकर यांचं धनगरी वेष परिधान करुन ढोल वाजवत आंदोलन
… तर या शेतकऱ्यांशी चर्चा का करत आहात ? चिदंबरम यांचा मोदी सरकारला खोचक सवाल