मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यावरून भाजपाला धारेवर धरताना दिसत आहेत. तर भाजपाकडून महाविकास आघाडीला जबाबदार धरलं जात आहे. या वादात आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीसाठी वेळ न दिल्याच्या मुद्द्याची भर पडली आहे. यावरून आता राजकीय खडाजंगी होताना दिसत आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता विधान परिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग”, अशी गत सध्या सचिन सावंत यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात, मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका. आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा”, असं प्रविण दरेकरांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
"उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग", अशी गत सध्या @sachin_inc यांची झाली असून, कसलीही माहिती न घेता, ते मत ठोकून देतात!
मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका!
आरक्षण वाचवणं जमलं नाही, आता किमान सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका तरी दाखल करा!
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 26, 2021
तर, “चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारं आहे,” अशी टीका सावंत यांनी केलेली आहे.
Read Also :
- शिवसेना आमदाराची गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट फसला
- “उद्धव, मी तुझी शिक्षिका, आमच्या वृद्धाश्रमाचं नुकसान झालंय, बाळा भेट मला”
- ‘मराठा क्रांती मोर्चाचा आणि विनायक मेटेंच्या मोर्चाचा काहीही संबंध नाही’
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अहमदनगरच्या ‘कुकडी’ खालील शेतीचे वाटोळे करायचे आहे, राम शिंदेंचा आरोप
- ‘आरक्षणासाठी संभाजीराजे खासदारकीचा राजीनामा देणार?’