पिंपरी । विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी तीन पिढ्या निष्ठावंत राहिलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांनी अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला. शिवसेना उबाठा गटाचे ‘शिवबंधन’ हातावर बांधले. या राजकीय बदलामुळे मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि माजी गटनेते राहुल कलाटे यांची ‘राजकीय कोंडी’ झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर महायुतीमध्ये सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गट भाजपासोबत लोकसभा निवडणूक एकत्रित म्हणजे ‘महायुती’ म्हणून लढणार, हे निश्चित आहे. जागा वाटपामध्ये भाजपाचा वरचष्मा राहणार, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
हेही वाचा…“२०२४ च्या पोटात काय दडलंय?” शिंदे गटासोबतच्या युतीसंदर्भात मनसेची मोठी प्रतिक्रिया
वास्तविक, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला परिसर असून, मावळातील मावळ, पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत. चिंचवड, पनवेल व उरणमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे वर्चस्व आहे, तर एकमेव कर्जत मतदार संघामध्ये एकनाथ शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार आहेत. या मतदार संघामध्ये शिंदे गटापेक्षा अजित पवार व भाजपाची ताकद मोठी आहे. दुसरीकडे, एकाच उमेदवाराला दोनदा संधी दिल्यामुळे ‘अन्टी इनकंपन्सी’ चा धोका असल्याची गोळाबेरेजीही करण्यात येत आहे. जागा वाटपाच्या चढाओढीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट मावळच्या जागेसाठी आग्रही राहणार आहे. कारण, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गत निवडणुकीमध्ये या मतदार संघामध्ये भाजपा-शिवसेनेशी दोनहात केले होते. आगामी निवडणुकीत याच मैदानातून पार्थ यांना संसदेत पाठवण्यासाठी अजित पवार आणि समर्थक यांनी दंड थोपाटले आहेत. पार्थ पवार यांच्या या विजयरथाचे ‘सारथ्य’ मावळचे आमदार सुनील शेळके करणार आहेत. त्यादृष्टीने शेळके यांनी बारणेंना ‘लक्ष्य’ करायला सुरूवातही केली आहे.
हेही वाचा…संतापजनक…! भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीवर ब’ला’त्का’र ; भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का ?
खासदार श्रीरंग बारणे यांचा बंदोबस्त
महायुतीच्या जागा वाटपामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचा महायुतीकडून पत्ता कट झाल्यास, ते महाविकास आघाडीकडे तिकीटासाठी ‘फिल्डींग’ लावणार हे निश्चित असल्यामुळे महाविकास आघाडीची ‘स्पेस’ भरुन काढण्यासाठी अजित पवार यांचे निष्ठावंत संजोग वाघेरे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये ‘डेरेदाखल’ झाले (केले) आहेत. अजित पवारांच्या सल्ल्यानेच ‘संजोग’ तिकडे गेला… असा दावा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांकडून केला जात आहे. ‘‘अजित पवार यांनी विनंती केल्यास संजोग वाघेरे आगामी निवडणूक ‘नुरा कुस्ती’ करतील’’ असा दावा केला जात आहे.
राहुल कलाटे यांचीही ‘नाकाबंदी’
मध्यंतरी राहुल कलाटे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा झाली. कलाटे मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर धडकल्याचेही वृत्त होते. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी हा प्रवेश रोखला. कारण, कलाटे आणि बारणे यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. किंबहुना, राहुल कलाटे महापालिकेत गटनेते असताना बारणे आणि कलाटे असे दोन गट शहर शिवसेनेत पडले होते. कलाटे यांच्यावर नाराज होवून बारणे समर्थक नगरसेवकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी अजित पवार यांनी मनधरणी करुनसुद्धा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला फायदा झाला होता. त्याचा राग अजित पवार व समर्थकांमध्ये आहे. राजकीय बदललेल्या परिस्थितीनुसार, वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती केली आहे.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत वंचितने कलाटेंना साथ दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक कलाटे वंचितच्या माध्यमातून मावळची उमेदवारी मागू शकतील किंवा चिंचवड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार होवू शकतील, ही शक्यता गृहित धरून महाविकास आघाडीतील संभाव्य उमेदवार आपल्या पट्टीतील असावा, या हेतूने संजोग वाघेरे शिवसेना उबाठामध्ये दाखल झाले आहेत. यामुळे खासदार बारणेंसोबत राहुल कलाटे यांचीही नाकाबंदी झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचामहाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरात सरकारने पळवला ; काॅंग्रेसची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा“मग बाबरीचा ढाचा त्यांच्या वजनाने पडला असेल”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी
हेही वाचा…मोदींनी लोकसभा निवडणुकीचं बिगूल अयोध्यात वाजवलं ; हजारो कोटींच्या कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला फुशारक्या मारू नये,” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार घणाघात
हेही वाचाशिवसेनेच्या सर्व वाघांनो तुमचं मातोश्री स्वागत ; अजित पवारांचा खंदा समर्थक ठाकरे गटात सामील