मुंबई : व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह व्यगंचित्र फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्याची घटना काल घटली होती. निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.
कांदिवलीतील निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांच्या डोळ्याला देखील दुखापत झाली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका केली होती. उद्धवजी हा गुंड राज बंद करा, अशा शब्दात फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कमलेश चंद्रकांत कदम, संजय शांताराम मांजरे, राकेश राजाराम बेळणेकर, प्रताप मोतीरामजी सुंद वेरा, सुनील विष्णू देसाई आणि राकेश कृष्णा मुळीक आहे.