अहमदनगर:- राहुरीच्या राजकारणात मोठा अनुभव पाठिशी असलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा राहुरीचे आमदार प्राजक्तदादा तनपुरेंसमोर आता राहुरीचा नगराध्यक्ष निवडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विधानसभेत निवडून गेल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.येत्या शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. आता प्राजक्त तनपुरे नगराध्यक्ष पदासाठी वरील दोघांपैकी कोणाला संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवीत ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. परंतु अवघ्या तीन वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने तनपुरे यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठविले. प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे, नगराध्यक्षपद रिक्त होते. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अनिता पोपळघट यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नंदकुमार तनपुरे, तर अनुमोदक म्हणून प्रकाश भुजाडी यांच्या सह्या आहेत. अनिल कासार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून राधा साळवे व अनुमोदक म्हणून संगीता आहेर यांच्या सह्या आहेत. राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाचे पूर्ण बहुमत आहे. जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, पालिकेतील गटनेत्या डॉ.उषा तनपुरे, मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बैठकीनंतर एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे, ते आज राहुरीत येणार असल्याचे समजते. त्यानंतर ते नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देतात याकडे राहुरी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.