मुंबई : ” मंदिरात तल्लीन झाल्याने कोरोना पसरतो असा अजब निष्कर्ष काढणारा गजब मुख्यमंत्री,’ असं म्हणत भाजपचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.
आचार्य भोसले यांनी म्हटलं आहे की, ‘मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक आणि लाखो गरीब कुटुंबांची आठ महिन्यांपासून उपासमार सुरु आहे. त्यांना कोणतीही आर्थिक मदत जाहीर न करता आणि मंदिरे उघडण्याचा देखील निर्णय न घेता आपण दिवाळीच्या शुभेच्छा कशा देऊ शकतो? त्यांनी दिवाळी कशी साजरी करावी ? हे सुद्धा कळाले नाही.’
‘मंदिरात भक्त तल्लीन झाल्याने कोरोना संसर्ग पसरतो, असे वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या अजब ज्ञानाचे प्रदर्शन घडविले आहे. उद्धवजी, भक्त मनाने “तल्लीन” होतो तो “टल्ली” होत नसतो. टल्ली होण्याची साधने आपण उघडली आहेत आणि मंदिरात अंतरंगाने तल्लीन होण्यातून कोरोना पसरतो हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हास्यास्पद निष्कर्ष आहे,’ असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.